वसई:- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांसह रुग्णांना बसू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत शनिवारी सकाळी १० वाजता पाहणी दौरा केला जाणार आहे. त्यामुळे यावर कोणत्या प्रकारे तोडगा काढला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा ते वसई फाटा दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. त्यातच आता ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक नियंत्रणात आली असली तरी वसई विरार शहराच्या वेशीवर त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.
गुरुवारी सकाळपासून महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अडकून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते.याशिवाय या वाहतूक कोंडीत १६ महिन्याच्या चिमुकल्याला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली होती. त्या चिमुकल्याचा वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा ससूनवघर जवळ पोहचताच मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे आरोप करण्यात येत आहे.
ठाणे व पालघरमध्ये होत असलेल्या वाढती वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी (२० सप्टेंबर) सकाळी १० वाजता महामार्गाचा पाहणी दौरा केला जाणार आहे. अशी माहिती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.