भाईंदर : मिरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात राहणारा भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक व अभिनेता खेसारीलाल यादव यंदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मिरा-भाईंदरमध्येही बिहार निवडणुकीच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे.

येत्या ६ व ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत बिहार राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत भोजपुरी कलाकार राजकारणात नशिब आजमावत असल्याने विशेष चर्चेला उधाण आले आहे. त्यात विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या राजद ( राष्टीय जनता दल )पक्षाकडून छपरा विधानसभा मतदारसंघातून खेसारीलाल यादव निवडणूक लढवत आहेत. भोजपुरी सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध गायक व अभिनेता असल्यामुळे देशभराचे लक्ष त्यांच्या उमेदवारीकडे केंद्रित झाले आहे.

दरम्यान, खेसारीलाल यादव हा मूळचा बिहारचा असला तरी सध्या तो महाराष्ट्रातील मिरा-भाईंदर शहराचा रहिवासी आहे.मिरा रोडच्या रामदेव पार्क भागात त्यांचा बंगला असून येथे तो आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण मिरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेत सुरू आहे.प्रामुख्याने खेसारीलाल यादव यांच्या संपर्कात मिरा-भाईंदरमधील उत्तर भारतीय समाज सतत असतो. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शहरात त्यांच्या बाबत चर्चेचे मोठे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अनेक समर्थकांनी बिहारमध्ये रवाना होऊन प्रचारात सहभाग घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वीच खेसारीलाल यादव यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र बिहार निवडणुकीत त्यांनी राजद पक्षाची निवड केल्याने येथील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

कोण आहेत खेसारीलाल यादव?

खेसारीलाल यादव हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि लोककलाकार आहेत. त्यांचा जन्म ६ मार्च १९८६ रोजी बिहारच्या छपरा जिल्ह्यात झाला. सुरुवातीला त्यांनी भोजपुरी लोकगीतांमधून लोकप्रियता मिळवली आणि नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात स्थायिक झाले. सध्या ते मिरा रोडच्या रामदेव पार्क भागात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. याशिवाय गोरगाव आणि अंधेरी येथे त्यांच्या सदनिका असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे.