वसई : वसई विरार मध्ये शॉट सर्किट यासह विविध प्रकारच्या कारणांमुळे आगी लागल्याच्या घटना घडतात. आगी लागल्यानंतर सावधानता बाळगून करावयाच्या उपाय योजना याबाबत पालिकेच्या अग्निशमन दलातर्फे अग्निसुरक्षेविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

वसई विरार अग्निशमन दलाच्या वतीने वसई विरार शहरात अग्नी विषयक जनजागृती करण्यासाठी १४ ते २० एप्रिल दरम्यान हा सुरक्षा सप्ताह घेण्यात आला. यात अग्निशमन दलाच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत अग्निशमन दलाच्या ध्वजाला मानवंदना देत जनजागृतीपर  उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यात पालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी गृह संकुले, मॉल, शोरूम, व्यापारी बाजारपेठा,शाळा- महाविद्यालये औद्योगिक कारखाने यासह अन्य विविध ठिकाणच्या भागात मॉक ड्रिल, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले

रविवारी शहरात आगीच्या दुर्घटना घडू नये यासाठी पालिका क्षेत्रातील विभागात अग्निशमन दलाच्या वाहनांचा ताफा घेऊन जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त सदानंद पुरव, शहरअभियंता प्रदीप पाचंगे, अग्निशमन दल प्रमुख दिलीप व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. यावेळी साहित्य प्रदर्शन, अग्निसुरक्षा विषयक मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात आले असल्याचे अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेविषयी सक्षमता, आगीच्या घटना घडू नये यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना देखील यातून प्रोत्साहन मिळावे यासाठी या सप्ताह आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी  अग्निसुरक्षा व इतर आपत्कालीन परिस्थितीत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रणा

शहरात घडणाऱ्या आग दुर्घटना व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालिकेच्या ताब्यात विविध प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा दाखल झाली आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे अत्याधुनिक ६४ मीटर उंच टर्न टेबल लॅडर या अग्निशमन व जीव संरक्षक वाहनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.तसेच रॉबोट याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आग दुर्घटना नियंत्रणासाठी प्रयत्न

शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आग दुर्घटना घडत असतात. २०२४ मध्ये साडेपाचशेहून अधिक आगीच्या घटना घडल्या होत्या.  आग दुर्घटना कमी करण्याच्या अनुषंगाने पालिकेच्या नऊ प्रभागात पथके स्थापन करून जनजागृती करणे, अग्निसुरक्षा उपाययोजना बाबत माहिती देणे, विद्युत लेखापरीक्षण करवून घेणे, अग्निसुरक्षा कार्यान्वित आहे की नाही तपासणी करणे यामुळे आगीच्या घटना कमी कमी होत आहेत. ज्या आगी लागत आहेत त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे असे पालिकेचे अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे.