वसई: दिवाळी सणाची लगबग सुरू झाली असताना, वसई-विरारमधील शहरी बाजारपेठांमध्ये ग्रामीण भागातील महिलांनी विणलेल्या भाताच्या कणसाच्या आकर्षक तोरणांनी लक्ष वेधून घेतले आहे. ही तोरणे पारंपरिक, पर्यावरणपूरक असल्यामुळे शहरी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. तर या हंगामी व्यवसायामुळे ग्रामीण महिलांना दिवाळीदरम्यान रोजगाराचे साधन मिळाले आहे.

वसई-विरारच्या ग्रामीण पट्ट्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. दिवाळी जवळ येत असताना, ग्रामीण भागातील महिला भाताच्या कापणीपूर्वीच या व्यवसायाला सुरुवात करतात. भाताची ओली कणसे काळजीपूर्वक एकत्र विणून त्यातून विविध आकाराची आणि आकर्षक पद्धतीची तोरणे तयार केली जातात. गेल्या काही वर्षांपासून या पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक तोरणांना शहरी भागातून मोठी मागणी मिळू लागली आहे. वसई-विरारच्या विविध भागातून तसेच आसपासच्या ग्रामीण पट्ट्यातून अनेक विक्रेते ही तोरणे घेऊन शहरी भागातील मुख्य बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. लहान तोरण १०० रुपये तर मोठे तोरण १५० रुपये दराने विकले जात आहे.

ही तोरणे साधारणपणे दिवाळी सणाच्या आठवडाभर आधी बनवली जातात आणि दिवाळीच्या दिवसात बाजारात विक्रीसाठी आणली जातात. भातलागवडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल (भाताची कणसे) उपलब्ध होत असल्याने, ग्रामीण भागातील महिलांना दिवाळीच्या तोंडावर एक चांगले हंगामी रोजगाराचे साधन मिळते.

शहरातील अनेक ग्राहक प्लास्टिक किंवा चिनी बनावटीच्या सजावटीच्या सामानाऐवजी या नैसर्गिक तोरणांना अधिक पसंती देत आहेत. या तोरणांच्या विक्रीतून मिळणारा पैसा कुटुंबाच्या दिवाळीच्या खर्चाला मोठा आर्थिक हातभार लावत असल्याची प्रतिक्रिया तोरण विक्रेत्या कल्पना मडके यांनी दिली.