भाईंदर : घोडबंदर मार्गावरील ठाण्याहून येणाऱ्या घाट रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम मिरा-भाईंदर महापालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ८ ऑगस्टपासून ११ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
घोडबंदर मार्गावरून मुंबई, वसई, विरार आणि भाईंदर भागातून मोठ्या प्रमाणावर हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. याच मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तसेच महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेस देखील नियमितपणे धावत असतात. मात्र, पावसाळ्यात या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
गेल्या काही महिन्यांमध्ये या मार्गावर अपघातांमध्ये सुमारे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. काही महिन्यांपूर्वी गायमुख ते फाउंटन हॉटेल या दरम्यानचा सुमारे साडेचार किलोमीटर रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता या मार्गाचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ ऑगस्टपासून या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, या कालावधीत वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता, घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार असून, याबाबतचे आदेश मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त अशोक तानाजी वीरकर यांनी जारी केले आहेत.
बंद होणारे मार्ग आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था
-वसई-विरार भागातून घोडबंदरकडे येणाऱ्या जड वाहनांना शिरसाट फाटा मार्गे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना शिरसाट – तारापूर – बोईसर – अंबाडी – चिंचोटी – कामान – अंजूरफाटा हा पर्यायी मार्ग वापरावा लागेल. तसेच चिंचोटी नाका मार्गे येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद करण्यात आला असून त्यांना कामान – खरवस – अंजूरफाटा – मिव्हची मार्गे वळवण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम द्रुतगतीमार्गावरून घोडबंदर रस्त्याद्वारे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही या काळात प्रवेश दिला जाणार नाही.
ठाणेकडून घोडबंदरमार्गे जाणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी गायीमुख घाटात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनी कासारवडवली – वाघबिल – कळवा – माजीवडा मार्गे पुढे नाशिक महामार्गाकडे वळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.गुजरात (अहमदाबाद) येथून येणाऱ्या जड वाहनांनाही ठाणेकडे येण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरून येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे अशा वाहनांनी मनोर – पोईशेत – वाडा – अंबाडी – मिव्हची मार्गे प्रवास करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या मार्गांवर बंदी दरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या असून नागरिकांनी सूचित मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.