भाईंदर : मुंबईत अवजड वाहनांना एका निश्चित वेळेतच प्रवेश दिला जातो.मात्र अनेक वाहन चालक नियोजित वेळेपूर्वीच टोल नाक्याजवळ येऊन रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. परिणामी येथील रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गवरील काशिमीरा मार्गावर मेट्रोसह अन्य पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू असल्यामुळे आधीच रस्ते अरुंद झालेले आहेत. त्यात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर डंपर व ट्रक उभे राहिल्याने वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे दहिसर, काशिमीरा ते वर्सोवा नाका दरम्यान सुमारे ५ किलोमीटरचा परिसर नियमितपणे कोंडीमय असतो.
विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु काही काळाने पुन्हा हीच समस्या सुरू झाली आहे. वाहनांमुळे रस्त्याच्या कडेला जागा अडवली जाते, परिणामी वाहनांची गती मंदावते आणि संपूर्ण रस्त्यावर वाहतूक ठप्प होते.
या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी काशिमीरा वाहतूक शाखेवर असूनही याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. उलट चालक मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला वाहने लावून मुक्तपणे थांबतात अशी तक्रार प्रवासी ठाकुर यांनी दिली आहे. तर अशा वाहनावर पुन्हा कारवाई ची मोहीम हाती घेणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आदेश धाब्यावर
दहिसर टोल नाक्यावर सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहनांना वर्सोवा पुलानंतर वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना पोलिसांनी जारी केली आहे.मात्र तरी देखील अनेक वाहने हे सकाळ च्या सुमारास दहिसर टोल नाक्याजवळ येत असल्याचे दिसून येतात.