भाईंदर : भाईंदर पश्चिम येथे उभारल्या जाणाऱ्या महावीर भवनाचे काम प्रशासनाने रद्द केल्यानंतरही बुधवारी या वास्तुच्या पूजेचा धार्मिक कार्यक्रम जैन आचार्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यामुळे महावीर भवन उभे राहणार असल्याचे वातावरण जैन नागरिकांमध्ये निर्माण झाले.मात्र अद्यापही या वास्तूला महावीर भवनाचे नाव देण्यात आलेले नसून ही भविष्यात सर्वांसाठी खुली राहणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मिरा रोड येथील सर्वे क्रमांक ५७९ आणि ५८० या जागेवरील नागरी सुविधा भूखंडावरील जागेवर 'महावीर भवन' उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. २२ एप्रिल २०२३ रोजी या भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडण्यात आले होते. सुरुवातीला नगररचना विभागाने नकाशे मंजुर करून १८६८.०३ चौ. मी ( तळ अधिक ३ मजले ) इतक्या बांधकामास मंजुरी देखील दिली आहे.परंतु १ ऑगस्ट २०२४ रोजी शासन निर्णयानुसार हे काम रद्द करून हा निधी अन्य ठिकाणी वळवण्यात आला. तसेच सदर ठिकाणी विकास हक्क प्रमाणपत्र मोबदल्यात उभी राहणारी इमारत ही सर्व धर्मीयांसाठी खुली राहणार असल्याची पालिकेने स्पष्ट केले होते. हेही वाचा : सायबर फसवणूकीत वाढ, ८ महिन्यात २ कोटींची रक्कम परत मिळविण्यात यश त्यामुळे नेमके महावीर भवन उभे राहणार की नाही? असा प्रश्न जैन समाजातील नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. तर काहींनी याविरोधात संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान बुधवारी आमदार गीता जैन आणि आचार्य भगवंत महाराजसाहेब व इतर जैन नागरिकांच्या उपस्थितीत परस्पर पूजा करून या कामास सुरुवात करण्यात आली. एकीकडे शहरात महावीर भवनाचे काम रद्द केल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्यानंतर देखील हा कार्यक्रम झाल्यामुळे सर्वत्र संभ्रम पसरला आहे. सदर ठिकाणी १० मजली बहुउद्देशीय इमारत बांधली जाणार असून ती सर्व धर्मीय व समाजासाठी खुली असणार आहे. अद्यापही त्या इमारतीला महावीर भवन असे नाव देण्याचा कोणताही निर्णय प्रशासकीय स्तरावर झालेला नाही. दीपक खांबित (शहर अभियंता मिरा भाईंदर महापालिका ) हेही वाचा : नालासोपार्यातील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरण: आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश प्रकरणात माजी आमदार नरेंद्र मेहतांची उडी? महावीर भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानंतर या प्रकरणात माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील उडी मारल्याचे समोर आला आहे.या वास्तूबाबत वाद समोर आल्यानंतर जर त्याठिकाणी 'महावीर भवन उभे राहत असल्यास ती जागा विकासकाच्या माध्यमातून नव्हे तर जैन समाजातील नागरिकांच्या सहकार्याने बांधून घेण्यात यावी, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. तसेच यासाठी मेहतांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीने १ कोटीचा सामाजिक दायित्व निधी देणार असल्याचे पत्र नूतकेच महापालिकेला दिले आहे.