भाईंदर :- भाईंदर पश्चिम येथे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नवरात्र उत्सवासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. मात्र, एरवी होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाईंदर पश्चिमेतील माहेश्वरी भवन मार्गावर ईस्ट वेस्ट फाउंडेशन तर्फे लोटस नवरात्रीचे आयोजन केले जाते. ही संस्था भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची असून यंदा या उत्सवाचे चौथे वर्ष आहे. भव्य स्वरूपात होणाऱ्या या गरबा उत्सवाला अनेक सिनेकलाकार व नृत्यप्रेमी हजेरी लावतात. त्यामुळे या नवरात्रीची शहरभर चर्चा असते.
दरम्यान, या नवरात्रीनिमित्त वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये भाईंदर पश्चिमेतील उड्डाणपुलाखालील मार्ग बंद करण्यात आला असून चालकांना पुढे डावीकडे असलेल्या डीमार्टकडून फिरून जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नवरात्रीवरून परतणाऱ्यांना सरळ मार्ग न देता पुन्हा डीमार्ट मार्गानेच मुख्य रस्त्यावर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी जागेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या नियमामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असली तरी स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. कारण, या परिसरात मोठी लोकवस्ती असून रस्त्यावर मोठे खड्डे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच मिरा रोड पश्चिमेकडे होणाऱ्या भरणीसाठी याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक होत आहे. यावर कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा पोलिसांना लेखी तक्रारी केल्या होत्या. प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आंदोलनही करण्यात आले होते. मात्र नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आमदारांच्या नवरात्रीसाठी पोलिसांनी तात्काळ तत्परता दाखविल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
” सदर ठिकाणी नवरात्री नंतर देखील पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून केले वाहतुकीत बदल केले जाणार आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई नियमित होईल.” – सागर इंगोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (काशिमिरा वाहतूक शाखा)