भाईंदर:- मिरा-भाईंदर शहरात नवीन इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य थेट रस्त्यावर येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहरातील बहुतांश ठिकाणी सध्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना राबवण्याचे सक्त आदेश महापालिका प्रशासनाने विकासकांना दिले आहेत. मात्र, अनेक विकासक या आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. परिणामी, दरवर्षी बांधकामस्थळी कामगारांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.

सध्या हेच धोके रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही निर्माण झाले आहेत. उंच ठिकाणी साहित्य पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेनचा मोठा भाग थेट रस्त्यावर येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महापालिका प्रशासनाने विकासकांना रहदारीच्या ठिकाणी काम करताना योग्य ती सुरक्षा यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावर माती पडण्याचे सत्र सुरूच

मिरा भाईंदर शहरात बांधकाम स्थळावरून मोठ्या प्रमाणात मातीची वाहतूक केली जाते.यात डंपरमधील माती रस्त्यावर पडून चिखलाचे साम्राज्य पसरते. महापालिका प्रशासनाने माती तसेच डेब्रिज वाहतुकीसाठी नियमवाली तयार केली आहे.तर याबाबतचे आदेश विकासाकांना दिले आहेत. मात्र तरी देखील अनेक विकास प्रशासनाच्या या आदेशाकडे कानाडोळा करत आहेत. काही दिवसापूर्वीच या नियमाचे पालन न केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने सनटेक विकासावर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता ही कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.