वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध प्रकारच्या कारणामुळे अपघाताच्या घटना समोर येत असतात. बुधवारी नालासोपारा फाटा येथे रात्रीच्या सुमारास कंटेनरचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि थेट हा कंटेनर कठडा तोडून खाली उलटला. हा कंटेनर खाली उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळला असल्याने त्यात असलेले प्रवासी जखमी झाले आहेत. एका प्रवाशाचा मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मागील काही वर्षात अवजड मालवाहतूक वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना ही समोर येत आहे.
बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक मालवाहतूक कंटेनर गुजरात वाहिनीवरून मुंबईच्या दिशेने निघाला होता. सोपारा फाटा येथे पोहचताच कंटेनरचा टायर फुटला त्यामुळे अनियंत्रित होऊन कठड्यावरून थेट खाली कोसळला.
मात्र हा कंटेनर खाली उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांवर कोसळला असल्याने मोठी दुर्घटना घडली आहेत. त्या वाहनात असलेले तीन ते चार प्रवासी जखमी झाले आहेत तर एका प्रवासी महिलेचा यात मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलीस, पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
अपुऱ्या उंचीचे कठडे धोकादायकच
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटिकरणामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. या उंचीमुळे वर्सोवा ते विरार फाटा या दरम्यान असलेल्या उड्डाणपुलांच्या संरक्षित कठड्यांची उंची कमी झाली आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणारी वाहने त्या पुलावरून खाली कोसळून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. अखेर या घडलेल्या घटनेनंतर सुरक्षा कठड्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
