वसई : मागील काही दिवसांपासून वसई पूर्वेच्या कामण परिसरात लोंबकळत असलेल्या विद्युत वाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत. यामुळे अधूनमधून येथील वीजपुरवठा खंडित होत आहे. तर दुसरीकडे या प्रकारामुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वसई पूर्वेच्या कामण परिसर आहे.या भागात महावितरणतर्फे वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत पोल उभारण्यात आले असून त्यावर विद्युत वाहक तारा जोडून नागरिकांना वीज जोडण्या दिल्या आहेत.  मात्र सध्या या  तारांची संख्या जास्त प्रमाणात झाल्याने त्याठिकाणी गुंता तयार होऊन या विद्युत वाहक तारा लोंबकलत आहे. या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत. असा प्रकार या भागात सातत्याने सुरू असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

याशिवाय येथील वीज खांब व त्यावरील तारा ही फारच जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे समस्येत आणखीन भर पडत आहे.कामण गावात मुख्य नाक्यावरच विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत.गावात जाणारा मार्ग असल्याने या रस्त्यावरून अनेक नागरिक ये जा करतात.  तर आजूबाजूची लहान मुले ही याच ठिकाणी खेळत असतात. जर ही विद्युत वाहक तार एखाद्याच्या अंगावर पडली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.महावितरण कडून विविध ठिकाणी तपासणी व दुरुस्ती अशी कामे सुरूच असतात. ज्या भागात ही समस्या निर्माण होत आहे त्या ठिकाणी लक्ष देऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील असे महावितरणने सांगितले आहे.