Factory Fire in Vasai: वसई:- वसईत तुंगारेश्वर फाटा येथील कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत कारखान्यांत असलेला लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
वसई पूर्वेच्या तुंगारेश्वर फाटा परिसरातील गिरीराज कॉम्प्लेक्स येथील चौथ्या मजल्यावर पुठ्ठा कारखाना आहे. शुक्रवारी सकाळी अचानकपणे या कारखान्याला आग लागली होती. या आगीच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रित करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
कारखान्यात मोठ्या प्रमाणात पुठ्ठे असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे. या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सागपाडा येथे भंगार गोदामाला आग
वसई पूर्वेच्या कामण येथील सागपाडा येथे एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. वसई फाटा येथील अग्निशमन उपकेंद्रातील अग्निशमन जवानांनी घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणली.