वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान विविध ठिकाणी रस्ता खराब झाला असून खड्डे पडले आहेत. यासाठी एजन्सी नियुक्त केली करण्यात आली असून रस्त्यावरील पॅनल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकल्प एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचून राहणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. याचा फटका येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. विशेषतः पावसाळ्यात फारच अडचणी येत असतात. यासमस्या सुटाव्या यासाठी १२१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले होते.आतापर्यंत ९५ किलोमीटर इतके काम पूर्ण झाले आहे.

नवीन कामानंतरही खड्डे

मात्र या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. तर काही ठिकाणी ओल्या असलेल्या रस्त्यावरच वाहने चालविली असल्याने रस्त्यावर टायर्स मार्क तयार झाले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याची उंच सखल अशी स्थिती तयार झाली आहे. अशा प्रकारे रस्ता खराब झाल्याने प्रवासादरम्यान दुचाकीस्वार पडून अपघाताच्या घटना घडत होत्या. काँक्रिटीकरणाचा नवीन रस्ता तयार होण्या अधिकच खड्डे व रस्त्याची दुरवस्था होत असल्याने याबाबत नागरिकांनी ही काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला होता. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ही याबाबत बैठका झाल्या आहेत. त्यावेळीही जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम पूर्ण करावे अशा सूचना केल्या होत्या.

त्यानुसार काँक्रिटीकरणानंतर ज्या भागात रस्ता खराब झाला आहे. त्यात रस्त्यावरील पॅनल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त केली असून ज्या रस्त्याचे काँक्रिटिकरण अधिकच खराब झाले आहे त्यांची तपासणी करून त्याठिकाणचा पॅनल काढून पुन्हा दुरुस्ती केली जात आहे असे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. मार्च अखेर पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. असेही चिटणीस यांनी सांगितले.

विशेष रसायन वापरून दुरुस्ती

पॅनल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जो भागा खराब झाला आहे. तेवढाच भाग काढला जात आहे. आणि त्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे केमिकल व वाळू यांचे मिश्रण तयार करून रस्त्यावर ट्रीटमेंट केली जात आहे. काम झाल्यानंतर एक दे दोन दिवस ठेवून नंतर तो रस्ता वापरासाठी खुला केला जात आहे.

वेगवेगळ्या कारणामुळे रस्ता खराब झाला आहे. त्याठिकाणी पॅनल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरच काम पूर्ण केले जाईल. – सुहास चिटणीस, प्रकल्प निर्देशक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिल २०२५ पर्यंत काम पूर्ण होणार

महामार्गावरील सुरक्षिततेसाठी, व्हाईट टॉपिंग प्रकल्पांतर्गत सुमारे ५६ किमी मेटल बीम क्रॅश बॅरियर आणि ९ किमी न्यू जर्सी बॅरियर समाविष्ट केले जात आहेत. त्याचेही काम चालू आहे. काम चालू असतांना डायव्हर्शन बोर्ड्स, कॉक्रीट बैरीबर, रिफ्लेक्टिव स्टिकर्स, ब्लिंकर्स लावण्यात आलेले आहे. अपघातप्रवण क्षेत्रांसाठी साइन बोर्ड, ब्लिंकर, ट्रान्सव्हर्स बार मार्किंग केले जाणार आहे. हा प्रकल्प एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामाच्या निगराणीसाठी ‘ऑथोरिटी इंजिनिअर’ लावण्यात आला असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सांगण्यात आले आहे.