वसई: नायगाव पूर्वेच्या ससूनवघर येथे एका आरएमसी प्रकल्पातील ३० फूट खोल विहिरीत पडल्याने गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरेलल्या तिसर्या मजुराला वाचविण्यात यश आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली.
नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथे सिमेंट वर प्रक्रिया करणारे आरएमसी प्लांट आहे. येथील एका आरएमसी प्लांट मध्ये काम करणारे विश्वजीत राजभर (२०) आणि राजन राजभर (२४) हे तरूण शेजारील महाकाल आरएमसी प्लांट मध्ये दोरी आणण्यासाठी गेले होते. या प्लांट मध्ये पाणी साठविण्यासाठी एक छोटी विहिर तयार करण्यात आली होती. ही विहिर ३० फूट खोल आहे. मात्र ते या खोल असलेल्या विहीरीत पडले. विहिरीत पडल्यानंतर त्यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. ते ऐकून जवळपास काम करणाऱ्या अजय यादव या मजुराने आजूबाजूच्या लोकांना बोलावून आणले.
आत पडलेल्या दोन्ही मजूरांना काढण्यासाठी सलमान खान (२५) हा मजूर विहिरीत उतरला होता. मात्र आतमध्ये त्याचा देखील श्वास कोंडू लागला. विहिर खोल आणि निमुळती असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. शेवटी हायड्रा क्रेन मागवून विहिरीत अडकेलल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. विश्वजीत आणि राजन हे बेशुध्द झाले होते. त्यांना कोल्हीगाव येथील निळकंठ रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सलमान यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला काशिमिरा येथील ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास उपचार सुरू असताना विश्वजीत राजभऱ आणि राजन राजभऱ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दोन्ही मजूर नायगावच्या ससूपाडा येथे राहणारे होते. ते मूळच्ये उत्तर प्रदेशातील बनारस येथे राहणारे होते. बंद असलेला आरएमसी प्लांट हा अंगद सिंग याच्या मालकीचा आहे.
याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत मजूर नेमके कसे पडले त्याचा आम्ही तपास करत आहोत. विहिर निमुळती आणि खोल होती. त्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल करे यांनी सांगितले.