वसई:- मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका शेतकरी व मच्छिमार बांधवांना बसला आहे. सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून खराब झाली आहेत. तर दुसरीकडे कापणी केलेले भात ही भिजून गेल्याने नासाडी झाली आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम सुरु होते. मात्र विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे मासळी सुकविण्याचा व्यवसाय अडचणीत येत आहे. असे असतानाही काही महिला आजही आपल्या घराच्या ओटीवर, समुद्रकिनाऱ्यावर किंवा उन्हाची जागा मिळेल तिथे मासळी सुकवून त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून आपला संसार चालवित आहेत.

मात्र मागील तीन दिवसांपासून वसई विरार भागात अवकाळी पावसाचे हजेरी लावली आहे.त्यामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा येथे वलांडी वर मोकळ्या कोब्यावर  सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे. बोंबील, मांदेली व अन्य ओली मासळी सुकविण्यासाठी बांबूच्या परातीवर तसेच जेट्ट्यांवर ठेवलेली मासळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णतः खराब झाली असल्याचे सुक्या मासळी विक्रेत्या महिलांनी सांगितले आहे.

तर काहींनी मासेमारी करून सुकविण्यासाठी मासळी आणली होती. पाऊस असल्याने ती बोटीत बर्फ मारून ठेवली होती. त्यामुळे ती मासळी वेळेत सुकविण्यासाठी लावता न आल्याने मोठ्या प्रमाणात मासळी फेकून द्यावी लागली असल्याचे मच्छिमार महिलांनी सांगितले आहे. बर्फ खर्च व मजूर खर्च व आम्ही केलेली मेहनत हे सारेच वाया जात असल्याची प्रतिक्रिया सुनीता जांबल या मच्छिमार महिलेने दिली आहे. वसईच्या किनार पट्टीवर मोठ्या संख्येने कोळी महिला मासळी सुकवून त्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. अशा निर्माण झालेल्या संकटामुळे लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र शासन स्तरावरून आम्हाला कोणतीच मदत मिळत नसल्याची प्रतिक्रिया मच्छिमारांनी दिल्या आहे. प्रत्यक्ष येऊन येथील परिस्थिती लक्षात घ्यावी व आम्हाला योग्य ती मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मच्छिमारांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे वसईच्या किनार पट्टीवरील सर्वच भागातील मच्छिमार नुकसानीचे पंचनामे करून तसा मदतीसाठी अहवाल आम्ही शासनाकडे सादर करणार आहोत. -विनोद लहारे, परवाना अधिकारी मत्स्यव्यवसाय विभाग

शेतकऱ्यांचे नुकसान

वसई विरार शहरात यावर्षी सात हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात भात पिकांची लागवड केली आहे. मात्र पावसाचा जोर काही कमी होत नसल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या कापण्या लांबल्या होत्या. मात्र ऑक्टोबरच्या मध्यावर पाऊस थांबला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापण्या केल्या होत्या. मात्र आता अवकाळी झालेल्या पावसात भात पूर्णपणे भिजून गेले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. पावसाचे सत्र असेच सुरू राहिले तर जे भात तयार झाले आहे ते ही खराब होऊन जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वसई विरार मधील भागात पावसात साधारपणे प्राथमिक अंदाज दोनशेहून अधिक हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषीविभागाकडून ज्या ज्या भागात नुकसान झाले आहे त्यांचा प्राथमिक आढावा घेतला जात आहे. लवकरच त्यांचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले जाईल असे वसई तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी सांगितले आहे.