वसई : विरार येथे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र आहे. मात्र या केंद्राची खिळखिळी झालेली इमारत, अपुरे मनुष्यबळ, सोयी सुविधांचा अभाव, आजूबाजूच्या परिसरात पसरलेली अस्वच्छता अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हे केंद्र सापडले आहे. त्यामुळे या पुनर्वसन केंद्राला अक्षरशः घरघर लागली आहे.
विरार पश्चिमेच्या बोळींज येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व अपंग कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र १९८३ साली सुरू झाले आहे. हे केंद्र ७८ गुंठे जागेत तयार करण्यात आले आहे. यात अपंग मार्गदर्शन कार्यशाळा व पुनर्वसन केंद्राचे विविध विभाग तयार करण्यात आले आहेत. यातून अपंगांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जात आहे. यात सर्व प्रकारच्या अपंगत्व बाधित व्यक्तींची मोफत तपासणी, अपंगत्वावर मात करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृत्रिम अवयव, साहित्य व साधने याचे वाटप, शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात शिफारस, अपंगत्व बाधित व्यक्तींना भौतिक, व्यावसायिक व वाचा उपचार, मूकबधीर अपंग व्यक्तींचे श्रवण आलेख काढणे, श्रवणयंत्रे व कानसाचा वाटप, शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन, रेल्वे / एस.टी प्रवास सवलत तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शिफारस, लहान वयात अपंगत्व कसे ओळखावे मार्गदर्शन व पुनर्वसन अशा सुविधा दिल्या जात आहे.
अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी जव्हार, मोखाडा, पालघर डहाणू, वसई विरार अशा जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून अपंग येत असतात. मात्र सद्यस्थितीत या केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने या केंद्रांची फारच बिकट अवस्था बनली आहे. या केंद्राची इमारत ही अनेक वर्षे जुनी झाल्याने ती खिळखिळी बनली आहे. इमारतीचे अनेक ठिकाणच्या स्लॅबचे काँक्रिट निखळून खाली पडले, तर अनेक ठिकाणी भिंतींना ही तडे गेले आहेत. खिडकीच्या काचा फुटलेल्या, केंद्रातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत, सीसीटीव्ही बंद, हजेरी यंत्र बंद, विजेचा अभाव आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता, संरक्षक भिंत नाही, ये जा करण्याचा खडतर मार्ग अशा अनेक समस्यांनी या केंद्राला ग्रासले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तर याच केंद्राच्या मागील बाजूस एक मजली अपंग मुलांच्या विकासासाठी शाळा होती ती शाळा ही २०१३ पासून बंद झाली आहे. त्यामुळे त्या शाळेच्या इमारतीची अवस्था बिकट बनली आहे. अशा धोकादायक व दयनीय झालेल्या इमारतीमध्ये येथील कर्मचारी व उपचारासाठी येणारे नागरिक यांना वावरावे लागत आहे.
एकीकडे विरार शहर विकसित होत असताना या केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशी अवस्था झाली असल्याचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी सांगितले आहे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील अपंग व्यक्तींना खूप लांबचा प्रवास करून येथे यावे लागते अशात एखादा कर्मचारी रजेवर असेल तर आर्थिक भुर्दंड व्यक्तींना लागतो. या दुरवस्था झालेल्या केंद्राचे नूतनीकरण करून योग्य त्या सोयीसुविधा रुग्णांना उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली आहे.
अपुरे मनुष्यबळ
मानसशास्त्रज्ञ, भौतिक उपचार तज्ञ, बहुद्देशिय पुनर्वसन उपचारक, व्यवसाय उपचार तज्ञ, श्रवण व वाचा उपचार तज्ञ, कानसाचा तंत्रज्ञ, मोबिलिटी इन्स्ट्रक्टर, लेखापाल, कृत्रिम अवयव अभियंता (वरिष्ठ), लिपिक, बहुउद्देशिय पुनर्वसन सहाय्यक, वाहनचालक, सफाई कर्मचारी यासह इतर एकूण २१ पदे या केंद्रासाठी मंजूर केली आहेत. मात्र त्यापैकी केवळ ७ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. अशा अपुऱ्या मनुष्यबळातच या कर्मचाऱ्यांचा कारभार चालवावा लागत आहे. सद्यस्थितीत थेरपी साठी ३० ते ३५ अपंग मुलं येतात तर अन्य उपचारासाठीही मोठ्या संख्येने येत असतात.
शासनाकडे पाठपुरावा सुरू
जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या मार्फत येणाऱ्या अपंग नागरिकांना योग्य त्या सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आम्हाला पुरेसे मनुष्यबळ, सोयीसुविधा, केंद्रांचे नूतनीकरण अशा विविध उपाययोजना करण्यासाठी सातत्याने आमचा पाठपुरावा करीत असल्याचे उपायुक्त (दिव्यांग पुनर्वसन अधिकारी) नितीन ढगे यांनी सांगितले आहे. इमारत दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
जिल्हानियोजन कडे प्रस्ताव
अपंग पुनर्वसन केंद्राची इमारत ही अनेक वर्ष जुनी झाल्याने खिळखिळी बनली आहे. ही इमारत धोकादायक बनल्याने वसई विरार महापालिकेने दुरुस्तीची नोटीस बजावली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने याचे सर्वेक्षण केले आहे. तसा दुरुस्तीसाठी लागणारा २० लाख रुपये खर्चाचा अहवाल पालघर जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय यादव यांनी सांगितले आहे. लवकर दुरुस्तीचे काम ही हाती घेतले जाईल असेही त्यांनी सांगितले.