भाईंदर : भाईंदरमध्ये एका विकासकाकडून नव्या इमारतीचे काम मागील दोन वर्षांपासून अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पस्थळी पाणी साचून डास आणि इतर समस्या निर्माण झाल्या असून स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
भाईंदर पूर्वेतील काशिनगर परिसर ही दाट लोकवस्ती असलेली जुनी वसाहत आहे. दोन वर्षांपूर्वी येथील एका मोकळ्या भूखंडावर विकासकाने नव्या इमारतीचे काम हाती घेतले होते. यासाठी खोदकाम करून पिलर उभे करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काम पूर्णपणे थांबवले गेले आणि विकासकाने बांधकामाकडे दुर्लक्ष केले.परिणामी मागील दोन वर्षांतील पावसाचे पाणी त्या जागेवर साचून त्याला आता तलावाचे स्वरूप आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या साचलेल्या पाण्यात शेवाळ देखील निर्माण झाले असून त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.यामुळे स्थानिक नागरिकांना डास, दुर्गंधी आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी देखील, पिलरचे काम सुरू असताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आसपासच्या जुन्या इमारतींना तडे गेले होते. आता अर्धवट सोडण्यात आलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
डेंग्यूचा प्रसार?
काशीनगर परिसरात मागील दोन महिन्यांत दहा पेक्षा अधिक संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ताप व इतर आजारांनी बाधित रुग्णांची संख्याही खासगी दवाखान्यांमध्ये वाढलेली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हे आजार प्रामुख्याने साचलेल्या पाण्यामुळेच पसरत आहेत. दरम्यान, या संदर्भात तक्रार प्राप्त होताच विकासकावर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.