वसई: मागील काही वर्षांपासून रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. मिरारोड ते वैतरणा या सात रेल्वे स्थानकांच्या दरम्यान नऊ महिन्यात ४८७ गुन्हे घडले आहेत. यात मोबाईल व पाकीटमारी असे गुन्हे अधिक आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरारोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशा सात रेल्वे स्थानके येत आहेत. मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
लोकल मध्ये व स्थानकात होत असलेल्या प्रचंड गर्दीचा फायदा आता भुरटे चोर घेत आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात ही चोरीचे गुन्हे घडत आहेत. पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, छेडछाड, बॅग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडू लागले आहे. यात विशेष करून गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारच्या घटना अधिक होत आहेत.विशेषतः विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते.
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधी दरम्यान ४८७ गुन्हे घडले आहेत. प्रामुख्याने यात रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत.मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात. तर सोनसाखळी चोरीच्या ८, फसवणूक ४, सरकारी कामात अडथळा ३ गुन्हे , विनयभंगाचे १० गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
४५ टक्के गुन्हे उघड
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातही स्थानकात गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त घालणे, अधूनमधून संशयितांची तपासणी, जनजागृती मोहीमा, फटका पॉईंटवर लक्ष ठेवणे असे काम सुरूच आहे. आतापर्यंत यंदाच्या वर्षात घडलेल्या गुन्ह्यात ४५ टक्के म्हणजे २१९ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. तर काही गुन्ह्यांचा अजूनही तपास सुरू आहे. मागील वर्षी रेल्वेत ८३५ गुन्हे घडले होते.
रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण हे मागील वर्षांपासून वाढले आहे. ते कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. प्रवाशांनी सुद्धा काळजीपूर्वक प्रवास करावा किंवा प्रवासा दरम्यान आक्षेपार्ह काही आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा.:- भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस ठाणे वसई
गुन्हे आकडेवारी
वर्ष गुन्हे उघड
२०२४ – ८३५ ४४०
२०२५ – ४८७ २१९
(सप्टेंबर)