मद्याची तस्करी करण्यासाठी मद्य तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून एक अनोख्या प्रकारची मद्य तस्करी उघडकीस आणली आहे. मद्य तत्कारांनी एका टेम्पोमध्ये प्लास्टिकच्या हजारो बनावट अंड्यांच्या मागे मद्याचा साठा लपवून ठेवला होता. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करून १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी कसकाळी ६ वाजता वाजता पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वाघोटे टोलनाका जवळ मनोर- कंचाड रोड येथे परराज्यातील मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून संशयित महिंद्रा मॅक्स पिकअप टॅम्पो (GJ-१९-६-७०९५ ) अडवून तपासणी करण्यात आली.

या टेम्पोमध्ये अंडी ठेवण्यात आली होती. मात्र तपासणी केली असता ही सर्व अंडी प्लास्टिकची असल्याचे आढळले. या अंड्यांच्या ट्रेमागे दादरा नगर हवेलीतून बेकायदेशीर रित्या तस्करी करून आणलेले विदेशी मद्य दडवून ठेवण्यात आले होते. आरोपींनी ५६० बनावट प्लास्टिक अंड्यांच्या ट्रे मध्ये एकूण १६ हजार ८०० प्लास्टिक अंडे ठेवले होते आणि त्यामागे ३३६ बिअर आणि ९४९ लिटर विदेशी मद्याच्या बाटल्या दडविण्यात आल्या होत्या. या कारवाईत एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी टेम्पो चालक कमलेश विश्नोई याला अटक करण्यात आली आहे. हा परराज्यातील मद्याचा साठा हा गुजरात मधील केलास नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आणण्यात आला असल्याची माहिती मिळाली. या आरोपीं विरोधात विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९चे कलम ६५ (A)(E) I. ८३.९८ अन्वये गुन्ह्य दाखल करण्यात आला असून नोंद केलेली आहे. फरार आरोपीचा शोध घेणे चालू आहे. आरोपी टेम्पो चालकाला २८ मार्च पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकाने केली