वसई-विरार शहरात पथदिवे लावण्यासाठी प्रस्ताव; ९० लाख खर्च

वसई : वसई विरारमधील मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे लावण्यात आले नसल्याने रात्रीच्या सुमारास अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर आवश्यकतेनुसार पथदिवे लावण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून सुमारे ९० लाख रुपये त्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. .

वसई, नालासोपारा, विरार, नायगाव अशा विविध ठिकाणच्या भागातून वसई-विरार शहराला जोडणारे मुख्य रस्ते गेले आहेत. या मुख्य रस्त्यावरून दररोज मोठय़ा संख्येने वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. या मुख्य रस्त्यावर अजूनही काही ठिकाणी पथदिवे लावण्यात आले नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या सुमारास अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याला छोटेमोठे खड्डेही पडले आहेत. तेही खड्डे या रात्रीच्या अंधारात दिसून येत नाही, तर काही ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने तेसुद्धा पटकन समजून येत नाहीत. त्यामुळे अधूनमधून अपघातांच्या घटना घडत असतात.

शहराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत. अशा ठिकाणी पथदिवे लावण्यात यावी, अशी मागणी सातत्याने पालिकेकडे केली जाते. अखेर पालिकेने शहरातील मुख्य रस्ते आहेत. व ज्या ठिकाणी पथदिवे लावण्यात आले नाहीत अशा ठिकाणी पथदिवे लावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. मुख्य रस्त्यावर पथदिवे लावण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करून त्यासाठी जवळपास ९० लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते प्रकाशनमान होऊन अंधारयात्रा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे’

  • वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर पालिकेने पथदिवे लावले आहेत. परंतु अनेकदा काही तांत्रिक बिघाडामुळे पथदिवे बंद पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेही नागरिकांना रात्रीच्या सुमारास अंधारातून प्रवास करावा लागत आहे.
  • अशा ठिकाणी पालिकेच्या विद्युत विभागाकडून देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे असे नागरिकांनी सांगितले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार केला असून लवकरच ते काम पूर्ण केले जाणार आहे.

एम. जी.  गिरगांवकर, शहर अभियंता महापालिका