वसई : प्रेयसीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने २४ वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. नालासोपारा मध्ये ही घटना घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या ३ मित्रांना अटक केली आहे. 

मयत तरुण प्रतिक वाघे (२४) हा नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील जिजाईनगर मधील साईकृपा चाळीत राहतो. याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीला तो इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवत होता. याबाबत या तरुणीने तिच्या प्रियकर भूषण पाटील याच्याकडे तक्रार केली. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भूषण पाटील हा आपल्या मित्रांना घेऊन आला. मोरेगाव तलावाजवळील रस्त्यावर प्रतिक वाघे याला बोलावले. माझ्या मैत्रीणीला मेसेज का करतो असा जाब विचारला आणि मारहाण करायला सुरवात केली. पाटील याच्या मित्रानेही प्रतिकला मारहाण केली. या मारहाणीची चित्रफितही तयार करण्यात आली होती. त्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात घेऊन जात होते.

मात्र मारहाणीमुळे तो रस्त्यातच बेशुध्द पडला. प्रतिकला उपचारासाठी विरारच्या बोळींज येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, प्रतिकची प्रकृती खालावल्याने त्याला मिरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाला. 

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह ७ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यातील ३ आरोपींना  अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली.