भाईंदर : – मिरारोड येथे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्यांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट घडला. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळून आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

मिरारोड येथील रामदेव भागात सलासार गृहनिर्माण संस्थेच्या नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्प स्थळीच कामगार झोपड्या उभारून राहत आहेत. दरम्यान सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास यातील एका झोपडीमध्ये आग लागल्याची घटना घडली. यात झोपडीमधील सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढून आजूबाजूच्या तीन झोपड्यांना आग लागली यामुळे एका मागोमाग एक असे सलग सिलेंडरचे तीन स्फोट झाले. या आगीत प्रकल्प स्थळी असलेले प्लास्टिक देखील जळाले. त्यामुळे उंच उंच आगीचे व काळ्या धुराचे
लोळ हवेत पसरले.

हेही वाचा – वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांचे ९३ व्या वर्षी निधन

हेही वाचा – वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

याबाबत कामगारांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली होती. त्यानुसार घटना स्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून पाच मोठ्या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.