वसई : दिवाळी सुरू होताच वसई विरार विविध ठिकाणाहून आग दुर्घटना समोर येऊ लागल्या आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास विरार पूर्वेच्या आर जे नगर येथे फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.
विरार पूर्वेच्या आर जे नगर येथे फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी अचानक दुकाना आग लागली. दुकानात लाकडाचे व प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला होता. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती.या आगीची माहिती स्थानिकांनी तातडीने पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले आहे.
नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण अजूनही समजू शकले नाही. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून फर्निचर दुकानातील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून खाक झाला आहे. आग आटोक्यात आली असून आता कुलिंग करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. शहरात दोन दिवसांपासून सातत्याने आगीच्या घटना समोर येत आहेत.