वसई: दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी वसई पूर्वेतील एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही लागली. या आगीत कारखान्यातील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात आली.

वसई पूर्वेला वालीव परिसर आहे. सोमवारी संध्याकाळी साडे चार वाजताच्या सुमारास या परिसरातील औद्योगिक वसाहतीतील ओशन इ. ई. कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. आग लागलेल्या कारखान्यात विद्युत उपकरणे बनवली जातात. या उपकरणांना लागलेल्या आगीमुळे कारखान्यातील आग वेगाने पसरली. स्थानिक नागरिकांकडून कारखान्याला लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान चार गाड्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. तर सोमवारी लागलेल्या भीषण आगीत एयर कंडिशर कॉइल, एयर कंडिशर युनिट, मिस्टर म्यॅकेनिक कंज्युमर टूल असे विविध प्रकारचे विद्युत उपकरणे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पार्टस जळून खाक झाले. ज्यामुळे कारखान्याच्या मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.