भाईंदर :-मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या नाट्यगृहाबाबत येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोलनाक्याजवळ मिरा भाईंदर महानगरपालिकेने भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाची उभारणी केली आहे. तीन वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या या नाट्यगृहाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात महापालिकेला जवळपास दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात मराठी व अन्य भाषांतील नाटके, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्टँड-अप कॉमेडी आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे.
मात्र, या कार्यक्रमांच्या वेळी व्यवस्थापनातील त्रुटींविषयी अनेक तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. यामध्ये वेळेवर नाट्यगृह उपलब्ध न होणे, कलाकारांची गैरसोय, साहित्याच्या ने-आणीत अडचणी निर्माण होणे आणि उदवाहिकेचा वापर सुरळीत न होणे यांचा समावेश आहे. नुकतेच प्रसिद्ध मराठी नाट्यकलाकार शरद पोंक्षे यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशाच प्रकारच्या तक्रारी काही इतर नाटककारांनीही केल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम नाट्यगृहाच्या वापरावर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नाट्यगृहातील त्रुटींची चौकशी करून आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. यासाठी समिती नेमण्यात येणार असून त्याअनुषंगाने व्यवस्थापन हाती घेतले जाणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आरोपांची चौकशी
मागील आठवड्यात महापालिकेच्या नाट्यगृहात ‘पुरुष’ या नाटकाचा व्यावसायिक प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, महापालिका प्रशासनाच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे हे नाटक निश्चित वेळेपेक्षा तब्बल एक तास उशिरा सुरू झाल्याचा आरोप नाट्यकलाकार शरद पोंक्षे यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी शहर अभियंता दीपक खांबित यांना दिले आहेत.