भाईंदर : दसऱ्याच्यादिवशी भाईंदर फाटक येथील अरुंद रस्त्यावर परिवहन मंत्र्यांचा ताफा बराच वेळ उभा राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.

मिरा भाईंदर शहरातील केरळ समाजाच्या वतीने गुरुवारी भाईंदर पूर्व येथील डिवाईन चर्चच्या सभागृहात ओणम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दुपारी दोनच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावली. त्यांच्यासोबत प्रशासकीय पोलीस ताफाही उपस्थित होता. मात्र अंत्यत रहादारी असलेल्या अरुंद रस्त्यावर मंत्र्यांचा ताफा बराच वेळ एकाच जागी उभा राहिला होता.

यामुळे काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी झाली.परिणामी भर उन्हात दुचाकीस्वार त्रस्त झाले, तर बस प्रवाशांनाही गर्दीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला. मंत्र्यांवर कामाची जबाबदारी असल्याने त्यांना या बाबीकडे लक्ष देणे शक्य नसले, तरी शहरातील वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अशा समस्या वारंवार निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे.