भाईंदर :– मागील काही दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महापालिकेच्या उपाययोजनांतील हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिरारोड व भाईंदर हे शहर भौगोलिकदृष्ट्या समुद्र, खाडी आणि राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध वसलेले आहे. शहराच्या किनाऱ्यावर कांदळवन असल्याने येथील सांडपाण्याचा निचरा संथ गतीने होतो. याशिवाय शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे डास आणि अळ्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.गेल्या काही दिवसांत डासांचे प्रमाण इतके वाढले आहे की, नागरिकांना सकाळ -संध्याकाळी दारे-खिडक्या बंद करून घरात बसण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर, तसेच उघड्या ठिकाणी थांबले तरी हे डास थेट चावत आहेत.
डास निर्मूलनासाठी नियमित कीटकनाशक फवारणी करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी दोन वर्षांसाठी १० कोटी रुपये खर्चाचा ठराव करण्यात आला असून, संबंधित कंत्राटही देण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील डासांचा उपद्रव कमी न झाल्यामुळे आणि फवारणी करणारे पथक प्रत्यक्षात शहरात दिसत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.दरम्यान, “शहरातील आदिवासी पाडे, मोकळे परिसर आणि इतर ठिकाणी दर आठवड्याने औषध फवारणी केली जात आहे,” असा दावा उपायुक्त सचिन बांगर यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत केला.
अर्धवट कामाचा मोठा फटका
मिरा-भाईंदर शहरात सध्या अनेक ठिकाणी नव्या इमारतींचे बांधकाम तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या कामांसाठी खोलवर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, पावसाच्या आगमनानंतर ही कामे अर्धवट सोडून देण्यात आली आहेत. परिणामी अशा बांधकाम स्थळांवर साचलेली माती आणि खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.