भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागाचे कामकाज पार पाडण्यासाठी दोन उद्यान अधीक्षकांची स्थायी स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. यात प्रभाग क्रमांक १,२ आणि ३ ची जबाबदारी ही उद्यान अधीक्षक हसराज मेश्राम यांच्यावर सोपवण्यात आली असून प्रभाग क्रमांक ४,५ आणि ६ ची जबाबदारी ही उद्यान अधीक्षक नागेश वीरकर यांच्यावर आहे. दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये पालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच वाद झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मेश्राम यांनी पोलीस ठाण्यात पालिकेच्या ‘लेटर हेड’वर वीरकर यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे.

हेही वाचा : मीरा भाईंदर महापालिकेचा २ हजार २९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कुठलीही करवाढ नाही, नागरिकांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीत मेश्राम यांनी विरकरांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये शुक्रवारी (१६ फेब्रुवारी ) दुपारी १ च्या सुमारास वीरकर यांनी विना परवानगी मेश्राम यांच्या नगरभवन येथील कार्यालयाची झाडाझडती घेतली असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर याबाबत विरकर यांना विचारणा केली असता शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला. त्यानुसार मेश्राम यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे तपास करत असल्याची प्रतिक्रिया भाईंदर पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना काम मिळवून देण्यासाठी या दोघांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.