भाईंदर :- मिरा भाईंदर शहराचा जवळपास ५० टक्के परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासत असल्यामुळे हे काम सध्या ठप्प झाले आहे.

मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारीचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने एकूण तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च करून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये मिरा रोड पोलीस ठाणे, नया नगर पोलीस ठाणे आणि उत्तन पोलीस ठाण्याचा परिसर पूर्णतः सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आला आहे. तर भाईंदर आणि नवघर पोलीस ठाणे हद्दीत देखील बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही बसवले गेले आहेत.

मात्र आता अन्य ठिकाणी कॅमेरे बसवण्यासाठी निधीची मोठी तूट प्रशासनाला भासत आहे. त्यामुळे हे काम शासनाच्या निधीतून पूर्ण व्हावे यासाठी पालिकेकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तत्पूर्वी, यास मंजुरी मिळेपर्यंत शक्य तितके सीसीटीव्ही कॅमेरे शहरात उभारण्यात येणार असल्याची माहिती सिस्टम मॅनेजर मनस्वी म्हात्रे यांनी दिली आहे.

नियंत्रण कक्षाची जोडणी :

मिरा भाईंदर शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाने भाईंदर पश्चिम येथे नियंत्रण कक्ष उभारला आहे. त्यामुळे उभारण्यात येणाऱ्या नव्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील जोडणी या कक्षाशी केली जात आहे. सध्या कक्षाचे कामकाज महापालिकेच्या मार्फत हाताळले जात आहे. मात्र शहरात सर्वत्र कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर हा कक्ष पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गृहविभागाच्या निधीची प्रतीक्षा कायम :

मिरा भाईंदर शहर संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या सूचना गृहविभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका सल्लागाराची नेमणूक करून गृहविभाग, पालिका आणि पोलीस या तिन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन शहराचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार शहरात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी एकूण १७४ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला नाही. तसेच गृहविभागाच्या निधी वाटपाच्या यादीत मिरा भाईंदरचा क्रमांक १९वा असल्याचे समोर आले आहे.