भाईंदर : मिरा रोड येथील दिवाणी व सत्र न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने बेवारस वाहने बऱ्याच दिवसांपासून उभी आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या उद्भवू लागल्या आहे. याकडे वाहतूक विभाग व महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या अधिकच बिकट बनू लागली आहे.

मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागांमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने ठरवले आहे. यासाठी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, शहरातील वाहतूक पोलिसांकडूनही अशा वाहनांवर कारवाई केली जाते.प्रामुख्याने, रस्त्याच्या कडेला वाहनं उभी राहिल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात या वाहनांमध्ये डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे अशा वाहनांवर वेळोवेळी कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

गेल्या काही महिन्यांत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अशा वाहनांवर कारवाई करून ही समस्या काही प्रमाणात नियंत्रणात आणली होती. मात्र, सध्या या विषयाकडे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, शहरातील विविध ठिकाणी पुन्हा बेवारस वाहने उभी राहिल्याचे दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या वाहनांचा फटका आता न्यायालय परिसरालाही बसला आहे. यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात या वाहनांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागेचा प्रश्न अद्याप कायम

बेवारस वाहनांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या होत्या. या मोहिमेअंतर्गत कारवाईनंतर जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार होते. मात्र, अद्यापही अशा जागेच्या नियोजनाबाबत धोरण निश्चित झालेले नाही. त्यामुळे संबंधित कारवाईची प्रक्रिया थांबलेली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.