भाईंदर : मिरा भाईंदर मधील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या लांब वाढल्या असून यामुळे गणेश मूर्त्यांच्या मिरवणुकी दरम्यान अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विसर्जनापूर्वी महापालिकेने वृक्ष छाटणी करून घेण्याची मागणी केली जात आहे.
मिरा भाईंदर शहरात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये जवळपास वीस हजार गणेश भक्तांनी घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. तर ६४७ सार्वजनिक मंडळाची मूर्ती विराजमान झाली आहे. सार्वजनिक मंडळाच्या या गणेश मूर्तीचे विसर्जन हे सातव्या आणि अखेरच्या म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी केले जाते.
प्रामुख्याने या मूर्ती आकाराने सहा फुटांपेक्षा उंच असल्यामुळे यांचे विसर्जन खाडी किनाऱ्यावर केले जाते. यापूर्वी गणेश भक्त गणरायाची मिरवणूक काढून नाचत-गाचत उत्साह साजरा करतात. यासाठी प्रशासनाकडून देखील विशेष सोय करून दिली जाते.
मात्र यंदा विसर्जन मिरवणुकीत रस्त्यावरील वाढलेल्या झाडांच्या फांद्या अडथळा ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गणेश आगमन प्रसंगी देखील या फांद्या उंच मूर्तीच्या वाहतूकीत बाधा ठरल्या होत्या. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी गणेशोत्सवापूर्वीच शहरातील झाडांच्या फांद्या छाटणीचे काम केले जाते. मात्र तरी देखील बहुतांश भागात या फांद्यांचा त्रास गणेश भक्तांना जाणवत आहे. म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वृक्ष छाटणीची कामे तातडीने करावी अशी मागणी केली जात आहे. तर वृक्ष छाटणीचे काम वेळोवेळी केले जात आहे मात्र एखाद्या ठिकाणाचा त्रास जाणवत असेल त्या ठिकाणी देखील छाटणी केली जाईल अशी माहिती महापालिकेच्या उद्यान विभागातून देण्यात आली आहे.