भाईंदर: मिरा भाईंदर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती साचून रस्ते निसरडे झाले आहेत. मात्र, तरीदेखील महापालिका प्रशासनाकडून रस्ते सफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे मिरा भाईंदरमधील बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या कामांची गती वाढवली आहे. यामध्ये बांधकाम स्थळांवरील माती व डेब्रिजची वाहतूक तसेच इतर साहित्याची सतत ने-आण केली जात आहे. मात्र, यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती पडत असून रस्ते खडबडीत व निसरडे झाले आहेत.प्रामुख्याने रस्त्यांवर माती टाकून वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे हे प्रकार सातत्याने घडत आहेत.
दरम्यान, रस्त्यांवर माती साचलेली असताना तिची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे. यासाठी सफाई कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांच्यावर दैनंदिन रस्ते सफाईचे काम सोपवण्यात आले आहे. मात्र, शहरातील काही अंतर्गत रस्त्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी रस्ते सफाईचे काम होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर माती साचलेली असून थोड्याशा पावसात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे.यामुळे दुचाकी वाहनांच्या अपघातांचा धोका वाढला आहे.तर पाऊस थांबतो तेव्हा ती धूळ सुकून हवेत उडून प्रदूषण निर्माण होत आहे. पावसाच्या विश्रांतीच्या काळात शहरातील रस्ते स्वच्छ करून घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाण्याचा मारा देखील बंद
मिरा भाईंदर शहरात धूळ पसरू नये म्हणून रस्त्यांवर साचलेल्या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी अग्निशमन दल व धूळ नियंत्रण वाहनांचा वापर केला जात होता. मात्र, पावसाच्या आगमनानंतर हे काम बंद करण्यात आले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा धुळीचा त्रास जाणवू लागला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.