भाईंदर – मिरा भाईंदर शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. परिणामी, रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेची समस्या उभी राहत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मिरा-भाईंदर शहरात सध्या सुमारे पाचशेपेक्षा अधिक जनावरे मोकाट फिरताना दिसून येतात. ही जनावरे काही खासगी तबेलेधारकांची असून, ते त्यांच्या जनावरांची योग्य देखरेख करत नाहीत. परिणामी, ही जनावरे शहरात मुक्तपणे फिरताना दिसतात. अनेक वेळा ही जनावरे रस्त्याच्या मध्येच बसत असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच, रस्त्यांवर शेण पसरल्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. याशिवाय, ही जनावरे कोणत्याही क्षणी अंगावर येतील, अशी भीतीही नागरिकांमध्ये आहे.

महापालिकेचे धोरण मोकाट जनावरांवर निर्बंध घालण्याचे असले तरी, प्रत्यक्षात त्यावर प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी खास कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरे दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यासंदर्भात महापालिकेकडून सुधारित धोरण तयार करून लवकरच ठोस कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तबेले स्थलांतराचा विषय रखडलेला

मिरा-भाईंदर शहरात सध्या ७२ तबेले असून, त्यामध्ये सुमारे पाच हजार जनावरे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील तबेले शहराबाहेर स्थलांतरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी मुंबई, मिरा-भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तबेल्यांना वसई येथे शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे.शहरात सुरु असलेल्या तबेल्यांना ‘कॅटल कंट्रोल अ‍ॅक्ट’ व महापालिका अधिनियमानुसार परवाने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मिरा-भाईंदरमधील कोणत्याही तबेलेधारकाकडे वैध परवाने नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने तबेले स्थलांतरित करण्यासाठी शासनाकडे अभिप्राय मागवला आहे. मात्र अद्याप शासनाकडून उत्तर प्राप्त न झाल्यामुळे हा विषय रखडलेला आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.