वसई: मिरारोड मध्ये तेलंगणा राज्यातून अमली पदार्थ पुरवठा होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने तेलंगणा राज्यात अमली पदार्थ तयार करणाऱ्या एका कारखान्यावर धाड टाकून कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी मिरा रोड मध्ये अमली पदार्थांचा व्यवहार करणार्या १० जणांच्या टोळीला अटक केली होती. या टोळीत एका बांग्लादेशी महिलेचा सहभाग होता. या टोळीकडून २३ लाखांचे मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ४ च्या पथकाकडे सोपविण्यात आला होता.
याच तपासादरम्यान अमली पदार्थांचा पुरवठा हा तेलंगणा राज्यातून होत असल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. या तपासात तेलंगणा मधील चेरापल्ली शहरातील नवोदया कॉलनी येथे अमली पदार्थाच्या कारखाना सुरू असल्याचा आढळून आला. पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई करून श्रीनिवास विजय वोलेटी व तानाजी पंढरीनाथ पटवारी यांना अटक केली.
या अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी एकूण १२ आरोपीतांना अटक केलेली असुन त्यांचेकडुन ५ किलो ९६८ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ, २७ मोबाईल फ ०३ चारचाकी व ०१ दोनचाकी वाहन, ०४ इलेक्ट्रीक वजन काटे, एमडी बनविण्याचे साहित्य, एमडी हा अंमली पदार्थ बनविण्यासाठी वापरलेले साहित्य असे कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा ४ चे पोलीस निरीक्षक प्रमोद प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे, सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदिप शिंदे, श्रीमंत जेथे व त्यांच्या पथकाने केली आहे.