भाईंदर: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एका महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात शिस्तीचा भंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरारोड पोलीस ठाण्याच्या एका महत्वाच्या कक्षात ४ आरोपींनी खुलेआमपणे धूम्रपान करत धिंगाणा घातल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या व्हायरल चित्रफितीत पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणीच आरोपींनी अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिरा भाईंदर शहरात घडत असलेल्या विविध घटना समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल होत असतात. सोशल मीडिया इंफ्लुएन्सर, तसेच शहराशी संबंधित पेजेसद्वारे व्हायरल चित्रफिती आणि फोटो नेटकऱ्यांपर्यंत पोहोचत असतात. अशीच एक चित्रफीत शनिवारी प्रचंड व्हायरल झाली होती. यात काहीजण पोलिस ठाण्याच्या एका कक्षात धूम्रपान करत असल्याचे आढळून आले. तर ही चित्रफीत मिरारोड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातील असल्याचे समाजमाध्यमांवर सांगण्यात आले होते.

पण, पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार ही चित्रफीत मिरारोड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातील नसून ती पोलीस ठाण्याच्या स्टोर रूममधली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरारोड पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांसंबधी चौकशी करण्यासाठी संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. तर चौकशीपूर्वी या आरोपींना पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते. चार आरोपींना पोलीस ठाण्यात बसवून पोलीस अधिकारी दुसऱ्या आरोपींना आणण्यासाठी गेले. हीच संधी साधून पोलीस ठाण्याच्या आवारात बसलेले चारही आरोपी मिरारोड पोलीस ठाण्याच्या स्टोर रूममध्ये शिरले.

त्यानंतर या आरोपींनी स्वतःजवळ असलेल्या सिगारेटी पेटवत धूम्रपान करायला सुरुवात केली. पण हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पोलीस ठाण्याच्या स्टोर रूममध्ये धूम्रपान करत धिंगाणा घालतानाची, नाचतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल केली. ही चित्रफीत व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत मिरारोड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हायरल चित्रफितीनंतर पोलिसांची कारवाई

आरोपींनी पोलीस ठाण्यात घातलेल्या धिंगाण्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी व्हायरल चित्रफितीतील आरोपींना अटक आहे. तसेच त्यांच्यावर कोटपा कायद्यांतर्गत (Cigarettes and Other Tobacco Products Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जबाबदार असणारे अधिकारी आणि अंमलदारांवर देखील वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाणारा असल्याचे मिरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी सांगितले आहे.