भाईंदर: मिरा-भाईंदर शहरातील महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार नागरी सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. यात खासगी व्यावसायिक मोठा आर्थिक लाभ उचलत असून जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आरक्षित भूखंडाचा गैरवापर अजूनही सुरूच राहिला आहे.

मिरा भाईंदर महापालिकेने गेल्या वीस वर्षांमध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक आरक्षित भूखंडविकसित करून त्यावर उद्याने, बाजारपेठा, मैदाने, सभागृहे, नाट्यगृहे आदी नागरी सुविधा उभारल्या आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या सुविधा अपुऱ्या ठरत असून, इतर आरक्षित भूखंडांचा विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मात्र आरक्षित जमिनी ताब्यात न आल्यामुळे हे काम रखडले आहे.विकास आराखड्यात ज्या कामासाठी भूखंड आरक्षित आहे, त्याच कामासाठी त्याचा वापर करणे बंधनकारक असतानाही, अनेक ठिकाणी भूखंडांचा व्यावसायिक वापर सुरू आहे. काही भूखंडांवर लग्न समारंभ, खासगी कार्यक्रम, मार्बल दुकाने, क्रिकेट टर्फ्स, तात्पुरती दुकाने अशा स्वरूपात उपयोग होत असून, मालक त्यावर लाखो रुपये कमवत आहेत.विशेष म्हणजे काही भूखंड महापालिकेच्या ताब्यात असूनही तिथेही खाजगी दुकाने थाटल्याचे दिसून येत आहेत.

दोन वर्षांपूर्वी शहरातील जवळपास २८ आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाल्याचा अहवाल अतिक्रमण विभागामार्फत तयार करण्यात आला होता.त्यावरून काही भूखंड प्रशासनाने ताब्यात देखील घेतले. परंतु पुन्हा याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे खासगी व्यवसायिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जर असाच प्रकार सुरू राहिला तर आरक्षित भूखंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.

निर्णयाकडे दुर्लक्ष

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी आरक्षित भूखंड संरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी करण्यात आला होता.मात्र, आजतागायत या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अतिक्रमण वाढले आहे.

“अनेक आरक्षित भूखंड महापालिकेने ताब्यात घेतले असून कुंपण भिंत देखील उभारली आहे. तर काही भूखंड हस्तांतरित करण्यासाठी जमीन मालकांनी वेळ मागितला असून लवकरच ती जागा देखील पालिकेच्या ताब्यात येणार आहे.” – पुरुषोत्तम शिंदे – सहायक संचालक नगररचनाकार (मिरा भाईंदर महानगरपालिका)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक्रमण असलेल्या भूखंडाची नावे

आरक्षण क्रमांक १२२ – मैदान व सामाजिक वनीकरण
आरक्षण क्रमांक २४१- कम्युनिटी हॉल व वाचनालय
आरक्षण क्रमांक १६२- उद्यान
आरक्षण क्रमांक १८७- उद्यान
आरक्षण क्रमांक २५९- शाळा
आरक्षण क्रमांक २५८-उद्यान
आरक्षण क्रमांक २१९- पोलीस आयुक्तालय
आरक्षण क्रमांक ३४०- मैदान
आरक्षण क्रमांक३६१ ते ३६४-उद्यान, मैदान शाळा