भाईंदर: मिरा भाईंदर शहरात मराठी साठी काढलेल्या मोर्चामुळे वातावरण चिघळले होते. त्यामुळे नियोजित ठरलेल्या ठिकाणी हा मोर्चा पोहचेल की नाही असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आंदोलन कर्त्यांनी धाडस करीत बालाजी हॉटेल ते मिरारोड स्थानक असा मोर्चा पूर्ण केला आहे.
मराठी भाषा बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्याकडून एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण केली होती. या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र मराठी भाषेची सातत्याने गळचेपी होत असल्याने मनसे, शिवसेना( ठाकरे ) कार्यकर्त्यांनी व मराठी एकीकरण समिती व अन्य संघटनांनी मंगळवारी एकत्र येत मिरा भाईंदर शहरात बालाजी हॉटेल ते मिरा रोड रेल्वे स्थानक असा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांनी सुरवातीला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा सुरू होताच आंदोलन कर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली.
त्यानंतर मराठी अस्मितेसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. सरकार या आंदोलकांवर पोलिसांचा दबाव आणत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते व विरोधकांकडून केला जात होता. अखेर दुपारी या मोर्चाला परवानगी देण्यात आल्यानंतर बालाजी हॉटेल ते मिरारोड रेल्वे स्थानक असा ‘जय भवानी, जय शिवाजी, मराठीचा जय जयकार करीत मोर्चा पूर्ण केला.
यानंतर स्थानकाच्या जवळ हजारोच्या संख्येने आंदोलन कर्ते एकत्र जमून मराठी विरोधात बोलणाऱ्यावर व मराठीचा अपमान करणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तर मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो अशी घोषणा यावेळी देण्यात आली. जिथे जिथे मराठी माणसाला व मराठी भाषेला विरोध होईल तेव्हा अशीच मराठी माणसांची एकजूट कायम दिसेल असे आंदोलनादरम्यान सांगण्यात आले.
कार्यकर्त्यांची सुटका
सुरुवातीला परवानगी नसल्याने मोर्चा काढण्यात आल्याने पोलिसांनी आंदोलनकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांना ताब्यात घेतले होते. या महिलांचा ही समावेश होता. सुमारे एक हजाराहून अधिक आंदोलन कर्ते ताब्यात होते. मात्र शासनस्तरावरून परवानगी देण्यात आल्याने धरपकड करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी सोडून दिले.
आंदोलनस्थळी नेत्यांची उपस्थिती
मिरा भाईंदर शहरात पोलीसांनी प्रमुख नेत्यांना येण्यास मनाई केली होती. मात्र परवानगी मिळाल्यानंतर मिरारोड स्थानकात मोर्चेकरी एकत्र जमल्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव,शिवसेना ( ठाकरे गट) राजन विचारे यासह विविध नेते आंदोलनस्थळी दाखल झाले होते. जर योग्य पध्दतीने पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली असती तर व्यवस्थित मोर्चा पार पडला असता असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. मात्र या सरकारने हा दबाव टाकून हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला.