भाईंदर : सोमवारी सकाळपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सगनई नाक्याजवळ पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यावरील माती वाहून गेली असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

मिरा-भाईंदर शहरात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे घोडबंदर घाट मार्गांवर डोंगरावरून वाहून येणारे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली.

दुपारनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सगनई नाका (दिल्ली दरबार हॉटेलजवळ) येथेही पाणी साचल्याचे समोर आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगर उतारावरून हे पाणी रस्त्यावर येत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या मार्गावर सध्या नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात पावसाचे पाणी जोरात वाहत असल्याने रस्त्यावरील रेती वाहून जात आहे आणि रस्ता खचू लागला आहे. परिणामी, अरुंद मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि काशिमिरा वाहतूक पोलिसांकडून पाण्याचा प्रवाह वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.