वसई: गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी वसई तहसील कार्यालयाशेजारील रस्त्यालगच्या गटारावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. रहदारीच्या ठिकाणचा स्लॅब कोसळ्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण या घटनेला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून स्लॅबची दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

वसई पश्चिमेत वसई तहसील कार्यालय आहे. १४ जुलै रोजी सकाळी कार्यालयाशेजारील रस्त्यालगच्या गटारावरील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. घटनेच्यावेळी स्लॅबच्या परिसरात फारशी वर्दळ नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नव्हती. पण, नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कोसळलेल्या स्लॅबचे लवकरात लवकर लेखापरीक्षण करून तो दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.

तहसील कार्यालय हे महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालय असून कार्यालयात दररोज विविध सरकारी कामांसाठी शेकडो नागरिकांची ये-जा असते. याशिवाय शाळकरी मुलेही या मार्गानेच प्रवास करतात. तसेच, सकाळी व्यायामासाठी पायी चालणाऱ्या किंवा धावणाऱ्या नागरिकांचाही या मार्गावर वावर असतो. गटारावरील स्लॅब कोसळून १५ दिवस उलटून गेल्यानांतरही महापालिकेकडून मात्र याची अजून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याशिवाय त्यात पडलेला मलबा ही उचलला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

या उघड्या अवस्थेत असलेल्या गटारात रात्री सुमारास कुणीतरी पडून मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच वारंवार स्लॅब खचण्याच्या घडत असताना महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ‘आय’ प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त अलका खैरे यांच्याकडे विचारणा केली असता बांधकाम विभागाकडून त्यांची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.