भाईंदर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलावर अवजड वाहने रस्त्याच्याकडेला उभी राहू लागली आहेत. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विविध विकासकामांमुळे वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, या नियमाकडे दुर्लक्ष करून सायंकाळी सातच्या सुमारास या महामार्गावर अवजड वाहनांची गर्दी होऊ लागते.

सुरुवातीला ही वाहने दहिसर पथकर नाक्यापूर्वी उभी राहत होती. मात्र, त्यामुळे पथकर नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार ही वाहने तेथून हटवण्यात आली. परंतु, मागील काही महिन्यांपासून हीच वाहने वर्सोवा पुलावर रस्त्याच्या कडेला उभी केल्याचे दिसून येत आहे.\

यामुळे पुलाचा मार्ग अरुंद झाला असून, प्रवाशांना नव्या वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पुलावर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात प्रामुख्याने खडी व सिमेंट वाहतूक करणारे डंपर आहेत. दररोज या मार्गावर पाचशेहून अधिक वाहने उभी राहत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे वर्सोवा ते नायगाव या पाच किलोमीटरपर्यंतचा रस्ता सतत जाम राहत आहे.तर मिरा भाईंदर मधील काशिमिरा कडे जाणारा रस्ता ही कोंडीत सापडतो.

नियम मोडून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढली

मुंबई शहरात प्रवेशासाठी अवजड वाहनांसाठी निश्चित वेळ निर्धारित केली आहे. त्या नियमानुसार या वाहनांनी मध्यरात्रीनंतर प्रवास करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक चालक या नियमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून दिवसभर या मार्गावरून प्रवास करताना दिसतात. परिणामी दहिसर पथकर नाक्यावर दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

“मुंबईत व्हीआयपी मुव्हमेंट असल्यामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आले होते. त्यामुळे वर्सोवा पुलावर गाड्या उभ्या राहण्याची समस्या उभी राहिली होती. मात्र इतर दिवस त्या ठिकाणी उभे राहणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई केली जात आहे.” – सागर इंगोले- वरिष्ठ पोलीस निरीक्षक (काशिमिरा वाहतूक शाखा )