भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडून ७२ तासाहून अधिकचा कालावधी पूर्ण झाला आहे.मात्र  तरी देखील पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारावर

कारवाई करण्याकडे दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका या कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भाईंदर येथील महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील  तरण तलावात रविवारी ग्रंथ मुथा (११) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संकुलातील

व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.त्यावरून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.तर या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला  नोटीस बजावली असून खुलासा मागवला आहे.

मात्र यास आता जवळपास तीन दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.यामुळे पालिका प्रशासन कंत्राटदाराला पाठीशी घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

तर याबाबत क्रीडा अधिकारी दीपाली जोशी यांना विचारणा केली असता त्यांनी कंत्राटदाराकडून खुलासाच आलेला नसून तो आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

कंत्राटदाराला राजकीय व्यक्तीचे संरक्षण?

क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन हाताळण्याचे कंत्राट महापालिकेने साहस चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला दिले आहे. मात्र प्रत्यक्ष क्रीडा संकुल हे भाजप पक्षातील सक्रिय व्यक्ती चालवत असल्याचे दिसून येतात.त्यामुळे या प्रकरणी भाजप पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या आशीर्वादामुळे पालिकेकडून कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत.

नागरिकांचा पालिकेवर धडक मोर्चा :-

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे  तरण तलावात बुडून ग्रंथ मुथा या मुलाचा मृत्यू झाल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्रदारावर कारवाई करण्यासाठी बुधवारी शहरातील नागरिकांमार्फत पालिका मुख्यालयावर धकड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शवविच्छेदनाचा अहवाल नायर रुग्णालयातून :-

नवघर पोलिसांनी ग्रंथ मुथा या मुलाच्या मृत्यूचा तपास हाती घेतला आहे. यात पोलिसांनी संकुलातील सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या ताब्यात घेतले आहेत. तर मुलाचा मृत्यू बुडून झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले असले तरी पोहताना मुलाला कोणता वेगळा त्रास झाला होता का? याबाबतचा अहवाल मुंबईच्या नायर रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवला आहे.