भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसाच्या हजेरीमुळे वाहतूक मंदावली आहे. परिणामी, मुंबईत प्रवेश करण्यापूर्वीच दहिसर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले असले तरी, कामावर जाणाऱ्या नागरिकांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच मंदावलेली दिसून येत आहे. त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या भागात रस्त्यावर अनेक खड्डे असून, रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली आहे, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे.बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीत बराच वेळ एकाच ठिकाणी उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.