वसई :- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहने बंद पडणे, खड्ड्यांची समस्या व अवजड वाहने बंदीचा नियोजन शून्य कारभार अशा विविध कारणांमुळे गुरुवारी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास दहातासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी कायम असल्याने वर्सोवा पूल ते वसई फाटा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग फारच मंदावला आहे. तर दुसरीकडे अवजड वाहने ही मध्येच बंद पडत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे. त्यातच गुरुवार पासून ठाण्याच्या भागात अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मात्र याचे योग्य ते नियोजन नसल्याने गुरुवारी सकाळपासूनच ठाणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
वर्सोवा पूल ते नायगाव फाटा, वसई फाटा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. जवळपास दहा तासाहून अधिक काळ ही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे महामार्गाजवळ राहणारे नागरिक व प्रवाशांनी सांगितले आहे. वाहतूक कोंडीमुळे काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दुहेरी कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. वाहतूक पोलीसांकडून वाहतूक नियंत्रण केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र वाहनांच्या रांगा पुढे सरकत नसल्याने वाहतूक पोलिसांना ही अडचणी येत आहेत.
रुग्णवाहिकांना फटका
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका रुग्णवाहिकांना बसला आहे विविध ठिकाणच्या भागात रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडत असल्याचे चित्र दिसून आले. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकून पडल्याने उपचारासाठी नेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.