वसई: मिरारोड येथील मीरागाव परिसरात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मीरागाव येथील मुंशी कंपाउंड परिसरात अड्डा बार ॲन्ड रेस्टॉरंट येथे विनापरवाना दारू विक्री केली जात असल्याची, तसेच या ठिकाणी ग्राहक दारू पिऊन मोठ्या आवाजात गाणी लावून नृत्य करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे शनिवारी (२५ ऑक्टोबर) काशीमीरा पोलीस ठाणे आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ मिरारोड यांच्या पथकाद्वारे संयुक्तपणे या बारवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत हॉटेलचे चालक-मालक, तसेच ग्राहकांना दारू पुरवणारे वेटर अशा एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच विनापरवाना विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.ताब्यात घेण्यात आलेल्या ११ आरोपींविरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(डब्ल्यू)१३१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई परिमंडळ-०१ पोलीस उप-आयुक्त राहुल चव्हाण, मिरारोड विभाग सहायक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे, विजय गंभिरराव, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

एक लाखाची विदेशी दारू जप्त

मिरारोड येथील कारवाईत पोलिसांनी बारमध्ये विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यात रेड लेबल, रॉयल स्टॅग, ऑक स्मिथ, ब्लेंडर प्राईड, कॅमिनो टकीला आणि इतर विदेशी मद्याचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांची एकूण किंमत १ लाख १८ हजार ४५५ रुपये इतकी आहे.