वसई: वसई विरार शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे विविध ठिकाणच्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यात सुमारे २२ हजारांहून अधिक वीज ग्राहक बाधित झाले आहेत. तर काही ठिकाणच्या भागात विजेचा लपंडाव सुरूच असल्याने तेथेही वीज ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.

वसई विरार शहरात मागील चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. अनेक ठिकाणच्या बैठ्या चाळी गृहसंकुले, दुकाने अशा ठिकाणी पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता नागरिकांना वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. आधीच नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यातच दहा ते बारा तास वीज नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. विजेविना  शहरातील नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी सुरू असल्याचे महावितरणने खबरदारीच्या कारणामुळे वीज पुरवठा खंडित केल्याचा दावा केला आहे.

नवघर पूर्व परिसर, आनंद नगर वसई, नालासोपारा छेडानगर, समेळपाडा, कोल्ही चिंचोटी, विरार चांदीप यासह अन्य ठिकाणच्या भागात वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला असल्याचे महावितरणने सांगितले आहे. तर नवघर येथील २२०/२२    ५० मेगा वॅट फीडरच्या ठिकाणी पाणी साचल्याने  तो बंद ठेवावा लागला त्यामुळे जूचंद्र, नवघर आणि जयविजय नगर भागातील वीज पुरवठा खंडित होत.

अनेक गृहसंकुलात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यांचे मीटर बॉक्स खाली असतात अशा वेळी वीज पुरवठा चालू ठेवल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे वीज बंद ठेवली असल्याचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

विविध ठिकाणी विजेचे खांब कोसळले

पावसाचा जोर अधिक असल्याने विविध ठिकाणच्या भागात विजेचे खांब कोसळण्याच्या घटना ही घडल्या आहे. कोल्ही, पारोळ, विरार अशा विविध ठिकाणी ९ विद्युत खांब कोसळले त्यांच्या दुरुस्ती करण्याची काम सुरू आहे.  विजेच्या संबंधीत प्रश्नांच्या संदर्भात दुरुस्ती रात्री अपरात्रीसाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. कोणत्या ठिकाणी वीज तारा तुटल्या किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाली तर महावितरणशी संपर्क करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.