भाईंदर : मिरा भाईंदर शहरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांतर्गत रस्त्यांना पडलेल्या खड्डयांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. गो ग्रीन फाउंडेशन ट्रस्टचे विरभद्र कोनापुरे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी मुख्य न्यायाधीशांसमोर शनिवारी होणार आहे.

दहिसर चेकनाका ते भाईंदर या मेट्रो मार्गिका ९ च्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने रस्ता नादुरुस्त होऊन त्यात प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी वारंवार अपघात होत अहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

मेट्रो कामादरम्यान रस्ता खराब झाल्याने मुख्य रस्त्यावर एमएमआरडीएने तीन वर्षांपूर्वी २२ कोटी १२ लाख ४९ रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराच्या माध्यमातून मास्टिक पद्धतीने डांबरीकरण करून घेतले. परंतु आज या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.

कंत्राटदाचा दोष दायत्व कालावधी पाच वर्षांचा असतानाही रस्त्याला दरवर्षी खड्डे पडत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळेच रस्ता पुन्हा खराब झाला आहे असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. याप्रकरणी एक त्र्ययस्थ चौकशी समिती स्थापन करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.