वसई : वसई पश्चिमेच्या नवघर माणिकपूर या ठिकाणी उभारण्यात आलेले रायफल शूटिंग केंद्राला अचानक टाळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मंगळवारी सरावासाठी आलेल्या खेळाडूंना ३ तास बाहेर ताटकळत उभे राहावे लागले आहे. ठेक्याचा कालावधी संपल्याने हे केंद्र बंद केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसई पश्चिमेच्या नवघर माणिकपूर परिसरात पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग रेंज केंद्र तयार केले आहे. यात वसई विरार,पालघर, दहिसर, कल्याण यासह विविध ठिकाणच्या भागातून खेळाडू सराव करण्यासाठी येत असतात. मंगळवारी सुद्धा नेहमीप्रमाणे खेळाडू सराव करण्यासाठी आले होते. मात्र केंद्राला टाळे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

येत्या ११ नोव्हेंबरला भोपाळ येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणार आहे.त्याचा सराव करण्यासाठी हे खेळाडू आले होते.मात्र केंद्र बंद असल्याने खेळाडूंनी चिंता व्यक्त केली. जवळपास तीन तास याच ठिकाणी हे खेळाडू ताटकळत उभे होते.आमच्या मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा देखील असणार आहेत. पण शूटिंग रेंज बंद झाल्यामुळे आमचा सराव खोळंबला असल्याचे खेळाडू यश्वि धामणकर हिने सांगितले.

इथे सराव करण्यासाठी वसई पालघर पासून अगदी टिटवाळा पर्यंतचे विद्यार्थी येतात. आणि ही शूटिंग रेंज सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे ती सुरू राहावी अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंनी दिली आहेखेळाडूंनी केंद्र सुरू करावे यासाठी माजी महापौर नारायण मानकर यांच्याशी संपर्क साधून केंद्र बंद असल्याची तक्रार केली होती. ऐन स्पर्धा तोंडावर असताना पालिकेचे शूटिंग रेंज केंद्र बंद असणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याबाबत तातडीने त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क करून शूटिंग रेंज केंद्र सुरू करण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शूटिंग रेंज केंद्र सुरू केले आहे.

ठेक्याचा कालावधी संपल्याने बंद होते.

रायफल शूटिंग केंद्र हे पालिकेने ठेका पद्धतीने चालविण्यासाठी देण्यात आले होते. मात्र केंद्र चालविण्याचा ठेक्याची मुदत संपल्याने हे केंद्र बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता नवीन ठेका नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती पालिकेच्या क्रीडा विभागाने दिली आहे. सद्यस्थितीत हे केंद्र सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.