वसई: वसई विरार शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत मात्र या विकास कामादरम्यान अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या वाहतुकी दरम्यान त्यांच्या चाकाला लागून चिखल रस्त्यावर पसरू लागला आहे. त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
मागील काही वर्षात वसई विरार शहराचे नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. शहरात विविध ठिकाणच्या भागात विकास कामे ही झपाट्याने सुरू आहेत यामुळे माती भराव, आर एम सी, याशिवाय विविध बांधकाम साहित्याची वाहतुकी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र या वाहतुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे नियम पाळलेले जात नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर माती वाहतूक करणारी वाहने ही चिखल पसरवू लागले आहेत.
तर दुसरीकडे त्यांच्या चाकांना लागून मोठ्या प्रमाणात चिखल हा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. अशा चिखलातून वाट काढताना वाहनधारक व अन्य पायी जाणारे प्रवासी यांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले असल्याने शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर अशा प्रकारची समस्या दिसून येत आहे असे नागरिकांनी सांगितले आहे.
विशेषतःनालासोपारा (पूर्व) परिसरात सध्या विविध ठिकाणी चालू असलेल्या बांधकामामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॅपिटल मॉल जवळ, नालासोपारा फायर ब्रिगेड समोर तसेच आचोळे भागातील बोहरी मशिदीसमोर रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत जरासा जरी पाऊस पडला तरी सुद्धा हे रस्ते ओले चिंब होऊन पूर्णतः चिखलमय होतात. अशावेळी येथून जाताना अपघात होऊ शकतो असे
दुचाकी स्वरांनी सांगितले आहे तर काही वेळा जे रस्त्याच्या कडेने पायी प्रवास करणारे प्रवासी आहेत. त्यांच्या अंगावरही बाजूने गाडी गेल्यानंतर चिखलाच्या ठिणग्या उडत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेने अशा प्रकारच्या समस्येकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे चिखल रस्त्यावर पसरून वाहतूकीला धोका निर्माण करणाऱ्या चालकांविरोधात कारवाईची मोहीम राबवून त्यावर कारवाई केली जाईल असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.