भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या पालिकेच्या अभ्यासिकेचे छत गळत आहे, सज्जाही कोसळायला टेकला आहे. त्यामुळे येथे अभ्यास करणारे विद्यार्थी जणू मृत्यूच्या छायेतच अभ्यास करत आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने सात अभ्यासिकांची निर्मिती केली होती. अभ्यासिकांची वाढती मागणी पाहता, २०१२मध्ये भाईंदर पश्चिम येथील उड्डाणपुलाखाली दुमजली इमारत उभारण्यात आली. पहिल्या मजल्यावर मुली तर दुसऱ्या मजल्यावर मुलांसाठी अभ्यासिका चालवण्यात येते. तळमजल्यावर ज्येष्ठ नागरिकांकरिता वाचनालय व विरंगुळा केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र अवघ्या आठ वर्षांत या इमारतीची अवस्था वाईट झाली आहे.

अभ्यास करता करता विदयार्थ्यांच्या अंगावर भिंतीचे पोपडे पडतात. ही इमारत अक्षरश: कधीही कोसळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने विदयार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत, लवकरात लवकर इमारतीची दुरुस्ती, डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक जैनम मेहता यांनी केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

भाईंदर पश्चिम येथील अभ्यासिकेची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये यापूर्वीही प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी पालिकेने बातमीची दखल घेऊन तात्काळ इमारतीचा रचनात्मक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. तसेच इमरातीच्या दुरुस्तीसाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र करोनाची दुसरी लाट आल्यानंतर प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. 

त्या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नगर भवन येथील अभ्यासिकेत हलवण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका