(मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील वर्सोवा पूल ते चिंचोटी मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या आता गंभीर झाली आहे.. ही समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतंत्र चिंचोटी वाहतूक शाखा तयार करण्यात आली होती. मात्र वाहतूकीचे होत असलेले ढिसाळ नियोजन यामुळे अवघ्या नऊ महिन्यात ही शाखा बरखास्त करण्याची नामुष्की ओढवली आहे. यावरूनच वाहतूक ‘नियोजनाची’ कोंडी होत असल्याने अखेर हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.)
मागील चार ते पाच वर्षांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उग्र रूप धारण करू लागली आहे. सद्यस्थितीत दळणवळणासाठीचे अन्य मार्ग जरी उपलब्ध होत असले तरी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जीवनवाहिनी बनला आहे. अलीकडच्या काळात या महामार्गावर निर्माण होणाऱ्या समस्यांनी वाहतूकदार त्रस्त झाले आहेत.
दहिसर चेक नाका ते विरार शिरसाड फाटा अशी एकूण २७.५० किलोमीटर ही चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिसांची हद्द आहे. त्या ठिकाणी चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिसांच्यामार्फत सुरुवातील वाहतुकीचे नियंत्रण केले जात होते. त्यानंतर मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर या महामार्गाचे कार्यक्षेत्र आयुक्तालयाच्या अंतर्गत येत आहे. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलीस आणि पोलीस आयुक्तालय अशा दोन्ही यंत्रणांकडून महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जात होती. जबाबदारी पार पाडत असताना दोन्ही विभागात वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने समन्वय नसल्याने तसेच कार्यपद्धती वेगळ्या असल्याने सतत वाद होत होते.
विशेषतः महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या अधिक बळावली, त्यामुळे याबाबत तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस आयुक्तालयाकडे आल्या होत्या. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता. आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या महामार्गाचा पूर्ण ताबा आयुक्तालयाकडे सोपविण्यात यावा असा प्रस्ताव तयार करून शासनाच्या गृह विभागाला पाठविला होता. त्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी देऊन तेथील कर्मचारी वर्ग, पोलीस केंद्र हे आयुक्तलयाकडे वर्ग होऊन जानेवारी २०२५ मध्ये महामार्गवरील वाहतूक नियोजनासाठी चौथी स्वतंत्र चिंचोटी शाखा तयार करण्यात आली होती.
स्वतंत्र शाखा तयार झाल्यानंतर महामार्गावर वाहनचालकांना शिस्त लागेल, योग्य ते वाहतूक नियोजन होईल तसेच विरुद्ध दिशेने, छेद रस्ते अशा भागातून प्रवास करणाऱ्यांना चाप बसेल असे वाटले होते. मात्र त्यांनतर देखील येथील समस्या कमी होताना दिसत नाहीत. नुकतेच घोडबंदर- ठाणे घाट मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी काढण्यात आलेल्या अधिसुचनेप्रमाणे नियोजन न झाल्याने सलग चार दिवस प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या कोंडीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस, रुग्णवाहिका, मालवाहतूकदार असे सर्वच जण अडकून पडले. तर दुसरीकडे महामार्गालगत असलेल्या गाव- पाड्यातील नागरिकांची ही कोंडी झाली. यापूर्वीही वाहतूक कोंडीत रुग्णावाहिका अडकून दीड वर्षीय बाळाचा मृत्यू झाला होता.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचे तीव्र पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांना थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या अशा आशयाचे पत्र टपालाद्वारे पाठवून अनोखे आंदोलन ही केले होते. वाहतुकीचे योग्य ते नियोजन होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवू लागली असल्याचा आरोप ही नागरकांमधून करण्यात येत आहे. तर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कोणतेच नियंत्रण नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे कोंडीत ही अधिकची भर पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्या तक्रारींमुळेच अखेर महामार्गाचे नियोजन व पर्यवेक्षण योग्यरित्या व्हावे यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी वाहतूक विभागात तातडीने मोठे फेरबदल केले. विशेषतः महामार्गावर तयार कऱण्यात आलेली स्वतंत्र चिंचोटी वाहतूक शाखाच बरखास्त करण्यात आली. आता पुन्हा महामार्ग हा वसई आणि विरार वाहतूक विभागाच्या कक्षेत आला आहे.
वाहतूक व्यवस्थापनाचे पूर्ण अधिकार आता वसई आणि विरार वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. आता तरी वाहतुकीचे व्यवस्थापान योग्य रीतीने होऊन या समस्येची तीव्रता कमी होण्याची गरज आहे. वाहनांची वाढती संख्या, अवजड वाहनांसाठी वाहनतळ नसणे तसेच नियमांचे उल्लंघन अशा विविध कारणांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. याचा फटका महामार्गावर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसोबतच आता वसई आणि विरार शहरातील नारिकांना आणि वाहनचालकांना बसताना दिसत आहे. यामुळे या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रभावी अंमलबजावणी असायलाच हवी
वाढती वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, सेवा रस्त्यांचा अभाव, खड्ड्यांची समस्या अशा एक ना अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उभी राहते. सद्यस्थितीत वाहतूक नियंत्रण करणे हे वाहतूक पोलिसांच्या समोरील मोठे आव्हान आहे. असे जरी असले तरी त्याचे योग्य ते नियोजन असायला हवे एखादी अधिसूचना काढली जाते. मात्र त्याचे पालनच झाले नाही तर समस्या कमी होण्याऐवजी ती अधिक वाढत जाते. यासाठी वाहतूक नियोजनासाठी ठरविलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अन्यथा नियोजनासाठी तयार केलेल्या नियमांचीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
प्राधिकरणाचा ही ढिसाळ कारभार…
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती सह विविध उपाययोजना करण्याची जबाबदारी ही प्राधिकरणाची आहे. मात्र बहुतांश वेळा रस्ते दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष, सेवा रस्त्यावरील अतिक्रमण न हटविणे, छेद रस्ते बंद न करणे, पथदिव्यांचा अभाव, अपघात घडल्यानंतर वेळेत वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन उपलब्ध नसणे अशा प्रकारे सातत्याने प्राधिकरणाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. या ढिसाळ कारभाराचा ही मोठा परिणाम वाहतुकीवर होऊन कोंडीची समस्या उभी राहते. अशा वेळी वाहतूक पोलीस ही हतबल होत असतात. यासाठी वाहतूक पोलीस आणि प्राधिकरण दोन्ही विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे तर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यास मोठी मदत होईल.
